महागड्या वैद्याकीय उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाला भूखंड हस्तांतरण प्रकरणात शासनाने सुमारे १५० कोटींची शुल्कमाफी दिली आहे. हे प्रकरण बंद करीत असल्याचे पत्र उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच ‘मालती वसंत हार्ट ट्रस्ट’ला पाठविले आहे. मात्र रुग्णालयातील काही जागेच्या वाणिज्य वापराबद्दल पावणेतीन कोटींचा दंड ठोठावून तो तात्काळ भरण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय वाणिज्य वापरापोटी दरवर्षी परवाना शुल्क भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ट्रस्टवरील विश्वस्तांची अदलाबदल हा भूखंड हस्तांतरणाचा प्रकार होत नाही, असा युक्तिवाद महसूलमंत्र्यांनी मान्य केला आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने आदेश जारी करण्यास सांगितले. त्यानुसार अनर्जित रकमेबाबत सुनावणी बंद झाल्याचे आणि वाणिज्य वापराबाबत दंड भरण्याचे आदेश उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जारी केले आहेत. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.
याबाबत कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाचे संचालक के. नारायण तसेच उपाध्यक्ष (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) श्रेणीक मेहता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र उपनगर जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी त्यास दुजोरा दिला.
७,२८५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाणिज्य वापर
२००७ पासून रुग्णालयात ग्लोबन बेक, कुबेर कॅफे, एचडीएफसी आणि एसबीआय बँकेचे एटीएम, स्टार बक्स, गिफ्ट शॉप, मेडिकल स्टोअर, तुरखिया ऑप्टिशिअन, यास्मिन ब्युटी सलून, आइस्क्रीम शॉप, छटोरी चाट शॉप, कॅफेटेरिया स्टॉल, सबवे, फाइन डायनिंग रेस्तराँ अशा सुमारे सात हजार २८५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाणिज्य वापर सुुरू आहे. त्यापोटी दोन कोटी ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अंबानी कुटुंबीय विश्वस्त…
शासनाने हा भूखंड मालती वसंत हार्ट ट्रस्टला दिला. तो मांडके फाऊंडेशनला हस्तांतरित करण्यात आला. तीन मूळ विश्वस्तांपैकी डॉ. नीतू मांडके, जोत्स्ना मांडके यांची नावे कमी करून त्याऐवजी कोकिळाबेन अंबानी, अनिल अंबानी, टीना अंबानी यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. कालांतराने के. नारायण आणि डॉ. तुषार मोतीवाला यांचीही विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
