‘कॅशलेस’ हेल्थ इन्शुरन्स बंद! खासगी रुग्णालयांचा निर्णय; विमा कंपन्यांकडे बोट

सध्या अनेक खासगी रुग्णालयांकडून आरोग्य विम्याची ( हेल्थ इन्शुरन्स) कॅशलेस सुविधा बंद करण्यात आली आहे. विमा कंपन्या मनमानी आणि जाचक अटी लादत असल्याचे रुग्णालयांचे म्हणणे आहे. यातच आता देशातील कोणत्याही रुग्णालयात ‘कॅशलेस’ आरोग्यविमा सुविधेचा लाभ घेता येईल, असे परिपत्रक जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (जीआयसी) काढले आहे. त्यामुळे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने रुग्णालयांना नव्याने कॅशलेस सुविधा न घेण्याची सूचना केली आहे. यामुळे विमा घेऊनही रुग्णांची कोंडी होऊ लागली आहे.

मागील काही काळापासून अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे बंद केले आहे. यामुळे रुग्णांना उपचाराचा खर्च आधी करावा लागत असून, नंतर त्याची भरपाई विमा कंपन्यांकडून घ्यावी लागत आहे. विमा कंपन्यांकडून वेळेत पैसे मिळत नसल्याची अनेक रुग्णालयांची तक्रार आहे. याचबरोबर उपचाराच्या खर्चाचे दरपत्रकही विमा कंपन्यांनी निश्चित केलेले नाही. या कंपन्या मनमानी पद्धतीने रुग्णालयांवर त्यांचे कमी दर लादत आहेत. त्यामुळेही रुग्णालयांमध्ये अस्वस्थता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *