सोमनाथ भारतींचा उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन

सोमनाथ भारतींचा उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन

कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेले दिल्लीचे माजी कायदामंत्री आणि आम आदमी पक्षाचे मालवीया नगर येथील विद्यमान आमदार सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे भारती यांच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

भारती यांची पत्नी लिपिका मित्रा हिने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

याविरोधात भारती यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत अटक टाळण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याआधी भारती यांची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली होती.

दरम्यान, सोमनाथ भारती हे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

पाच वर्षांपासून सोमनाथ भारती छळ करत असल्याचा आरोप पत्नी लिपिका यांनी तक्रारीत केला आहे. ‘मी शारीरिक, मानसिक, मारहाण, शिवीगाळ आणि शाब्दिक हिंसाचाराची बळी ठरले आहे,’ असा आरोप लिपिका यांनी केला आहे.

सोमनाथ भारती यांचे २०१० साली लिपिका मित्रा यांच्यासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर वर्षभरात आपल्यासोबत मारहाण केल्याचा आरोप लिपिका यांनी केला आहे. लिपिका सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करत आहे. भारती यांनी आपल्याकडे हुंड्याची मागणी केल्याचेही लिपिका यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *