मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरच्या हद्दीत सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जण ठार झाले.

अपघातातील सर्व मृत धोंडे कुटुंबातील असून, ते साता-यातील आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करुन नवी मुंबईतील आपल्या घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

या अपघातात धोंडे कुटुंब ज्या क्वालिस गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीचा अक्षरक्ष चक्काचूर झाला. त्यावरुन अपघाताची भीषणता लक्षात येते.

धोंडे कुटुंबियांची क्वालिस गाडी मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूरच्या हद्दीत वेगात असलेल्या गाडीचा टायर फुटला आणि गाडी अनियंत्रित होऊन समोरुन येणा-या डंपरवर आदळली.

सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धोंडे कुटुंब नवी मुंबईत कोपर खैराणे येथे रहात होते.

अपघात झाल्यानंतर पोलीस व आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. मात्र अपघातानंतर मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यास कुणीही धजावत नव्हते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी दाखल झालेले पत्रकार व अपघातग्रस्तांना नेहमी मदत करणारे गुरूनाथ साठेलकर यांनी गाडीतील छिन्नविचिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजुला करण्यात आली. पोलीस यावेळी बघ्याची भूमिका घेत असल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सचिन काशिद यांनी अशा घटनेच्या वेळी नेहमी पुढाकार घेवून मदत करणार्‍या पत्रकारांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *