वातावरण निर्मितीसाठी मोदी आठवडाभरात दुसऱ्यांदा राज्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी सोलापूरमध्ये येणार असून यावेळी राज्यातील ९० हजार घरांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या शुक्रवारी नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्यानंतर आठवडाभरातच पुन्हा राज्यात येत असल्याने महायुतीला अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शुक्रवारी (१२ जानेवारी) पंतप्रधानांनी नाशिकध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजेरी लावली व त्याच दिवशी संध्याकाळी शिवडी-न्हावाशेवा अटल सागरी सेतूचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यापाठोपाठ येत्या शुक्रवारी, १९ तारखेला पंतप्रधान सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील ९० हजार लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप व १,७०० कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन होणार आहे. यावेळी मोदी यांची जाहीर सभादेखील होईल.

मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याची जोरदार तयारी सुरू असतानाच त्यांच्या सलग दौऱ्यांच्या कारणांचीही चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व महायुतीला राजकीय फायदा व्हावा, या उद्देशानेच मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे येथून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीला प्रोत्साहन दिल्याची चर्चा आहे. महायुतीने ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असले तरी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या इंडिया आघाडीचे मोठे आव्हान आहे. शिंदे गटाच्या यशाबाबत भाजपचे नेतेही खासगीत शंका उपस्थित करतात. तर अजित पवार यांचा जोर ठराविक पट्टयातच आहे. यामुळे भाजपला स्वबळावर जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत. त्यामुळे भाजपला अधिकाधिक अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी मोदी यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *