सांगली : माजी सैनिकाकडून ७ कोटी, ८२ लाख वेळा राम नामाचा जप व लेखन

विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील रहिवासी माजी सैनिक मारूती खोत यांनी गेल्या चार दशकांच्या कालावधीत तब्बल ७ कोटी ८२ लाख ४५ हजार वेळा श्रीरामाचा नामाचा जप करीत २३५ वह्यामध्ये नामलिखाण केले आहे. ही त्यांची रामभक्ती अयोध्यामध्ये होत असलेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने औत्सुक्याचा विषय ठरली आहे.

विठुरायाचीवाडी गावचे मारुती खोत (वय ६६) हे सैन्यदलात होते. तेव्हापासून त्यांनी श्री राम लिहत जप करायला आणि श्री राम नामजपाचे पाठ करायला सुरुवात केली. ९ मे १९८१ रोजी खोत यांनी सैन्यात सीमेवर असतानाच मिळेल त्या वहीमध्ये श्री राम लिहायला सुरुवात केली. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर खोत यांनी अधिक जास्त वेळ नाम जप करायला सुरुवात केली. आजही खोत यांचे लिखाण सुरू आहे.

 आतापर्यंत एकूण ४२ वर्षांच्या कालावधीमध्ये छोटी, मोठी अशा २३५ वह्यांमध्ये खोत यांनी श्रीरामाचा जप करत श्री राम श्री राम असे लिखाण केले आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास ७ कोटी ८२ लाख ४५ हजार इतक्या वेळा आपण श्री राम वहीमध्ये लिहिल्याचा दावादेखील खोत यांनी केला. ही सर्व रजिस्टर आजही खोत यांनी जपून ठेवली आहेत. आर्मी युनिटमधील पंडितजी मिश्रा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री राम नामाचे पठण लिहिण्यास सुरुवात केली असे खोत सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *