मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी होती. मात्र रविवार, १४ जानेवारी रोजी सुट्टी असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात पतंग उडवून मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे जायबंदी झालेल्या तब्बल ८५ पक्ष्यांवर मुंबईतील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अॅनिमल’ (बैलघोडा रुग्णालय) रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापैकी ११ पक्षी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. दरवर्षी पतंगाच्या मांजामध्ये अडकून पक्षी जायबंदी होतात. अशा जखमी पक्ष्यांना परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अॅनिमल रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येते. मकर संक्रांतीच्या दिवशी पक्षी जखमी होण्याचे प्रमाण लक्षात घेता रुग्णालयाने शहराच्या विविध भागागमध्ये विशेष रुग्णवाहिका पाठविल्या होत्या. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून काही संस्थांनी मुंबईतील भायखळा आणि हाजीअली या भागामध्ये जखमी पक्ष्यांसाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.
