जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने निराधार मुलांची दत्तक प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान मागील तीन ते चार वर्षाच्या कालावधीत मुलींना अधिक पसंती दिली जात असल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले होते. याच पद्धतीने यावर्षी देखील जिल्हा महिला बालविकास विभागाने दत्तक प्रक्रिया राबविली असून याद्वारे ४१ मुले दत्तक घेण्यात आली आहेत. यामध्ये १४ मुले तर २७ मुलींचा समावेश आहे. यामुळे बहुतांश पालकांचा कन्या दत्तक घेण्याकडे ओढा कायम असल्याचे दिसून आले आहे. तर यातील काही बालकांना परदेश स्थित दाम्पत्यांनी दत्तक घेतले आहे.
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली येथील जननी आशिष शिशु केंद्र आणि नेरुळ येथील विश्व बालक ट्रस्ट या दोन शासनमान्य संस्थांकडून निराधार मुलांचा योग्य पद्धतीने सांभाळ करता येतो. तसेच येथील मुले योग्य कुटुंबात दत्तक कसे जातील यासाठी येथील कर्मचारी आणि महिला बाल विकास विभागाचे अधिकारी प्रयत्नशील असतात. जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही बालसंगोपन केंद्रे चालविण्यात येतात. या विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीतून मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची बाब समोर आली आहे.
