शेतमजूरीच्या पैशातून कोट्यवधींचा मसाला उद्योग उभारणाऱ्या मराठमोळ्या उद्योजिकेचं निधन

एमडीएच, एव्हरेट आणि मजेठियासारख्या भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या मसाल्यांच्या स्पर्धेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा असलेल्या कमल परदेशी यांचं निधन झालं आहे. स्वत: निरक्षर असूनही महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला. अंबिका मसाल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या कमला यांच्यावर मागील काही काळापासून पुण्यात उपचार सुरु होता. कमल यांना ब्लड कॅन्सर झाला होता. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 63 वर्षांच्या होत्या. दौंड तालुक्यातील खुटबाव गावात त्यांच्यावर अत्यंस्स्कार केले जाणार आहेत.

शेतमजूर ते उद्योजिका

शेतमजुरी करणारी महिला कोट्यवधींचा उलाढाल करणारा उद्योग उभारु शकते याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलेल्या कमला यांचा प्रवास थक्क करणार आहे. 2000 साली खुरपणीच्या माध्यमातून मिळालेल्या रोजंदारीच्या पैशांच्या आधारावर व्यवसाय सुरु करणाऱ्या कमला यांनी त्यांच्या मसाल्याच्या उद्योगाची सुरुवात झोपडीमधूनच केली. सध्या त्यांची अंबिका मसाले कंपनी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे.

जर्मनीपर्यंत पोहोचले अंबिका मसाले

सुरुवातीला कमला यांनी पुण्यातील सरकारी कार्यालयाबाहेर मसाल्यांची विक्री केली. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्राहकपेठा आणि प्रदर्शनांमधून मसाला विक्री सुरु केली. हळूहळू बिग बाझारमध्ये त्यांचे मसाले विकले जाऊ लागले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. जर्मनच्या माजी चॅन्सलर अँजेला मार्केल यांनीही कमला यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. मुंबईमध्ये नाबार्ड बँकेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात मार्केल आणि कमला यांची भेट झाली होती. आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्या या कमला यांच्या मागणीनंतर खरोखर काही आठवड्यांमध्येच अँजेला मार्केल यांच्या पुढाकाराने जर्मनीमध्ये अंबिका मसाल्यांच्या विक्रीला परवानगी मिळाली आणि विक्री सुरुही झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *