आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

सरकार शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक घोषणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र, आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कड्याक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर  अंघोळ करावी लागतेय. आश्रम शाळेत बाथरुम नसल्याने विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी नदीवर जावे लागतेय. पालघर जिह्यातील एका आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. देश घडवणाऱ्या पिढीला आत्तापासून मोठा संघर्ष करावा लागत आहे.

पालघर मधील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा चाबके – तलावली या निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थांना अनेक अचणींचा सामना करावा लागतोय. येथे पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत स्नानगृहच नाही. यामुळे येथे राहणाऱ्या  विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून नदीत आंघोळीसाठी जावं लागत आहे.

कडाक्याची थंडी आणि पाऊस याचा विचार न करता या आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी स्नानगृह नसल्याने आपला जीव धोक्यात टाकून नदीतील वाहत्या पाण्याचा प्रवाहात आंघोळी साठी जावं लागत आहे. कडाक्याच्या थंडीत देखील हे चिमुकले विद्यार्थी कोणत्याही सुरक्षा शिवाय नदीत अंघोळीसाठी जातात.  ह्या वेळेस त्यांच्या सोबत कोणताही शिक्षक जात नसल्याचेही या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे आदिवासी विकास प्रकल्पांच्या अनुदानित आणि विनाअनुदान आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग वर्षाला कोट्यावधी रुपये निधी खर्च करत . मात्र हा खर्च केला जाणारा निधी नेमका जातो कोणाच्या खिशात असा प्रश्न या सगळ्या प्रकारानंतर उभा राहिला आहे. आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्नानगृह आणि स्वच्छतागृह या सुविधा देणे बंधनकारक असताना देखील या आश्रम शाळेत ह्या प्रकारच्या कोणत्याही सुविधा नसल्याचं येथील विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *