गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ने (म्हाडा) जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे तसेच कल्याणजवळ सुमारे ५४ एकर भूखंडाची राज्याच्या महसूल विभागाकडे मागणी केली गेली आहे. हे भूखंड मिळाल्यास म्हाडाला गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबवून १९ हजार घरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
मुंबईतील गिरण्यांची एक तृतीयांश जागा विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार, म्हाडाला ताब्यात मिळाल्यानंतर त्यावर गृहनिर्माण योजना राबविण्यास सुरुवात झाली. २०१२ पासून आतापर्यंत २७ गिरण्यांच्या भूखंडांवर गिरणी कामगारांसाठी १५ हजार ८७० सदनिका उभारण्यात आल्या आहेत. यापैकी ११ हजार १५८ सदनिका वितरित करण्यात आल्या असून चार हजार ७१२ सदनिका शिल्लक आहेत. नोव्हेंबर २०२३ पर्यंत गिरणी कामगारांना घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळालेल्यांची संख्या फक्त १ हजार ७१८ इतकीच आहे.
