डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील बेकायदा इमारत भुईसपाट करण्याचे नियोजन, फ प्रभागाकडून लवकरच कारवाई

येथील खंबाळापाडा येथील एस. एस. स्टील मार्ट जवळची सात माळ्यांची बेकायदा इमारत विकासकाने स्वताहून जमीनदोस्त करून घेण्याचे आदेश फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी गेल्या महिन्यात दिले होते. विकासकाला दिलेल्या नोटिसीची मुदत संपूनही विकासक स्वताहून इमारत तोडून घेत नसल्याने पालिकेच्या फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी ही इमारत भुईसपाट करण्याचे नियोजन केले आहे.

ही बेकायदा इमारत तोडण्याचे नियोजन जाहीर केले तर विविध प्रकारचे दबाव आणून कारवाईत अडथळा आणला जातो. त्यामुळे या कारवाईचे नियोजन गोपनीय ठेऊन अचानक ही कारवाई हाती घेतली जाणार आहे, असे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी सांगितले. मौजे आजदे गोळवली हद्दीतील डोंंबिवली-कल्याण रस्त्यावरील खंबाळपाडा (कांचनगाव) येथील केडीएमटी बस आगाराजवळ एस. एस. स्टील मार्टजवळ ही बेकायदा इमारत आहे. या इमारतीमधील सदनिका विकण्याची तयारी सुरू आहे. या इमारतीवर लवकर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार राजेंद्र नांदोसकर यांनी केली आहे.

 पालिकेतील निवृत्त उपअभियंता सुनील जोशी कल्याण डोंबिवली पालिकेचे साहाय्यक संचालक नगररचना असताना त्यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये या तीन माळ्याच्या इमारतीला बांधकाम परवानगी दिली होती. जमीन मालक धनंजय शेलार, विकासक अश्विनी ब्रिजराज पांडे, संदीप मोहन डोके, महेश मंधुकर लहाने यांनी पालिकेला अंधारात ठेवले. विकासकांनी या तीन माळ्याच्या अधिकृत इमारतीवर चार बेकायदा मजले बांधले. तक्रारदार नांदोसकर १० वर्षांपासून या बेकायदा इमारतीवरील कारवाईसाठी प्रयत्नशील आहेत. ‘लोकसत्ता’कडे या बेकायदा इमारतीची कागदपत्रे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *