कोरोनानंतर संपूर्ण जगाचे डोळे आता चीनमध्ये उद्भवलेल्या नव्या आजाराकडे लागले आहेत. चीनमध्ये सुरु झालेल्या नव्या साथीने जगाचं टेंशन वाढलं आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशातच भारत सरकारनेही या आजाराचा धोका बघून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या चीनमध्ये एका गूढ आजाराने सर्वांनाच अडचणीत आणले आहे. या श्वसनाच्या आजाराने मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांना ग्रासलं आहे. भारत सरकारही या गूढ आजारावर बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की भारत चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. मात्र आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार भारताला या आजाराचा धोका कमी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की ते उत्तर चीनमधील मुलांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरसची प्रकरणे आणि श्वसन आजाराच्या नोंदवलेल्या उद्रेकावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. चीनमधून नोंदवलेली एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रकरणे आणि श्वसनाच्या आजार या दोन्हींपासून भारताला कमी धोका आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सध्याच्या परिस्थितीतून उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी देश तयार आहे.
