गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकरच या’ असा जयघोषात शुक्रवारी मुंबईत ठिकठिकाणी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी दादर, गिरगाव आणि जुहू चौपाटीवर गणेशभक्तांची तुडुंब गर्दी उसळली होती.
रात्री नऊवाजेपर्यंत ४५,९३३ घरगुती गणपती व ५१ सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी चिमुकल्यांनीही जुहू, वर्सोवा आणि गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, शीतल तलाव (कुर्ला), पवई तलाव येथील विसर्जनस्थळी गर्दी केली होती.
सुरक्षेसाठी गिरगाव चौपाटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विविध ठिकाणी २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी पाहून हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘स्टिंग रे’ची धास्ती कायम
मागील वर्षी गणेश विसर्जनादरम्यान समुद्रात उतरलेल्या भाविकांना स्टिंग रे माशाने चावा घेतल्याने अनेक जण जखमी झाले होते. या स्टिंग रे माशांच्या धास्तीपायी चौपाटयांवर विशेष दक्षता घेण्यात आली होती. गिरगाव चौपाटीवर पालिकेचे अधिकारी, बोटी, आरोग्य केंद्र, लाईट्स आदींचा व्यवस्था होती. तसेच किनारपट्टयांवर गर्दी होऊ नये, कचरा इतरत्र टाकू नये, यासाठी मुंबई महापालिकेने तयारी ठेवली होती.


