दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी जालन्यातील नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जालना जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. रवी घुमारे असं या नराधमाचं नाव आहे.
जुन्या जालना भागातील इंदिरानगरमध्ये दोषी रवी घुमारे याने 6 मार्च 2012 रोजी चॉकलेटच्या आमिषाने दोन वर्षाच्या चिमुकलीला आपल्या घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्यानंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली होती.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जालना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी रवी धुमारेला फाशीची शिक्षा सुनावली.

