मुसळधार पावसाने ‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूक विस्कळीत!

मुसळधार पावसाने ‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूक विस्कळीत!

पुणे जिल्ह्यातील कामशेत, कान्हेफाटा, वडगाव, तळेगाव, साते या गावांमध्ये शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरही पाणी आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्याचबरोबर कान्हेफाटाजवळ रेल्वे ट्रॅकवरील खडी वाहून गेल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणा-या आणि पुण्याकडे येणा-या लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा मोठा जोर आहे. मावळ तालुक्यातही पावसाची संततधार आहे. साते गाव ते कामशेत या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. द्रुतगती मार्गावर ओझर्डेजवळही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी स्थानिक लोक वाहनचालकांना पाण्यातून गाडी बाहेर काढण्यासाठी मदत करत असल्याचे पाहायला मिळाले. या भागातील छोटे नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी छोटे पूलही पाण्याखाली गेले आहेत. लोणावळ्याच्या तुलनेत कामशेत, तळेगाव, देहूरोड या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसले. कान्हेफाटाजवळील स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *