रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याने आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली. याशिवाय मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळावर पोहचले असून त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच याबाबत माध्यमांना माहिती दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “दरड कोसळल्याने लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ व स्थानिक मदत पथक काम करत आहे. मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. मात्र, वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर उड्डान करू शकत नाही.”
“मी स्वतः हवाईदलाशी बोलत आहे”
“मी स्वतः हवाईदलाशी बोलत आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. ज्या माध्यमांचा वापर करता येईल त्या त्या माध्यमांचा वापर करून मदत केली जाईल. जनावरंही मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. काही वेळापूर्वीच एनडीआरएफच्या जवानांनी एका जनावराला जीवंत बाहेर काढलं. एका मुलीलाही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान, बचाव पथकांनी आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका केली आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
