मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पावसाने मुक्काम ठोकला आहे. मुंबई, तसेच उपनगरांत बुधवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी घरातूनच कार्यालयीन काम करणे पसंत केले, तर कार्यलयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी काहीजण घरातून लवकर बाहेर पडल्याचे दिसत होते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई शहर, उपनगरात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी १.२३ वाजता भरतीची वेळ असून लाटांची उंची ४.२५ मीटर असणार आहे. यादरम्यान पाऊस असाच कोसळत राहिल्यास मुंबईत पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *