फलटण येथील नारळीबाग परिसरात अविनाश पोतेकर हे शहरातील पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहात होते. त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अमित हा पुणे येथे खासगी बँकेत नोकरीला होता. पुण्याहून तो घरी आला होता. त्यानिमित्त घरी सकाळी पुरणपोळी आणि संध्याकाळी मटण बनवण्यात आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर काही वेळाने पिता-पुत्रांना घरामध्ये त्रास होऊ लागला आणि खोकला आला. त्यानंतर या दोघांनीही काढा करुन प्यायला होता. मात्र काढा प्यायल्यानंतर मध्यरात्री या दोघांना उलट्या होऊ लागल्या. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आज सकाळी सकाळच्या सुमारास त्यांचा एक तासाच्या अंतरानेया दोघांचा मृत्यू झाला.
पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. शवविच्छदेन झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आले. रविवारी संध्याकाळी ज्यांना ज्यांना हे दोघं भेटले होते त्यांना या बातमीमुळे धक्का बसला आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने या पिता-पुत्रांचा मृत्यू झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शव विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पिता पुत्राच्या अकस्मात मृत्यूमुळे फलटणवर शोककळा पसरली आहे.