उड्डाणपुलावरून उडी मारणाऱ्या वृद्धाला झेलून पोलिसांनी वाचवले प्राण

उड्डाणपुलावरून उडी मारणाऱ्या वृद्धाला झेलून पोलिसांनी वाचवले प्राण

कौटुंबिक वादातून वाकड पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला दोन पोलिसांनी अक्षरशः झेललं आणि त्याचे प्राण वाचवले. आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही चित्तथरारक घटना घडली.

भाऊसाहेब अर्जुन वाकडकर असे दैव बलवत्तर असलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.  सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मोरे व महेश कांबळे यांनी प्रसंगावधान राखत वाकडकर यांचा जीव वाचवला.

वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी या घटनेविषयी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश मोरे व महेश कांबळे हे हिंजवडी-वाकड पुलाखालून जात होते. तेव्हा त्यांना पुलावर असलेले भाऊसाहेब वाकडकर हे गोंधळलेल्या व संतापलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी याबाबत त्यांचे वरिष्ठ चिमणाजी केंद्रे यांनाही माहिती दिली.

वाकडकर हे पुलावरुन उडी मारण्याचा प्रयत्नात असतानाच या तिघांनीही वाकडकर यांना खालून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाकडकर ऐकण्यास तयार नव्हते. वेळप्रसंग पाहता त्यांना रोखण्यासाठी पुलावर जाणेही पोलिसांना अशक्य होते. अखेर तिघांनीच छोटेखानी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला. मोरे व कांबळे यांनी वाकडकर यांना बोलण्यात गुंतवून ठेवले.

तोपर्यंत केंद्रे यांनी पुलाखालील वाहतूक रोखून धरली. आपल्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे लक्षात येताच वाकडकर यांनी खाली उडी मारली. लगेचच मोरे व कांबळे यांनी त्यांना झेलले. या घटनेत वाकडकर यांचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र, त्यांचा जीव बचावला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *