हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवलं? शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पालकांनी मुलींना घरी आणले असून, या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुटीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला

संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी ३,५०० रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून, तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊदरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी मुलींना घरी आणले. त्यानंतर १८ जून रोजी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत वसतिगृहात जाऊन माहिती घेतली असता वसतिगृहाच्या शिक्षिका मुलींना पारंपरिक नृत्य शिकवत असताना पर्यटक ते पाहत असतील; परंतु मुलींना कोणत्याही प्रकारे इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही, असा दावा एका शिक्षकाने बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *