लेक अन् सून परदेशात नोकरीला, फ्लॅटमध्ये आई-वडिलांचा मृतदेह; पुण्यातील त्या घटनेत काय घडलं?

शुक्रवार पेठेत चिंचेची तालीम परिसरात एका फ्लॅटमध्ये ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, तर महिलेचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) आणि त्यांची पत्नी सुनिता (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचेची तालीम येथील आशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील फ्लॅटमध्ये थोरात दाम्पत्य राहत होते. त्यांना एक मुलगा व मुलगी असून, ते दोघेही नोकरीच्या निमित्ताने परदेशात असतात.

थोरात एका सहकारी बँकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांनी रविवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या एका मित्राला फोन करून घरी येण्यास सांगितले. त्यानुसार ते मित्र सकाळी आठच्या सुमारास घरी आले. त्या वेळी त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते थेट फ्लॅटमध्ये गेले असता त्यांना थोरात यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. सुनीता या बेडरूममध्ये पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. थोरात यांच्या मित्रांनी तत्काळ शेजारी व नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. तसेच, खडक पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *