नाशिकमध्ये खळबळ! 10वीतल्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, मुख्यध्यापकांच्या कक्षातून बाहेर पडताच घेतला टोकाचा निर्णय

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील आश्रमशाळेत सोळा वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत या विद्यार्थी शिक्षण घेत होता. मयत विद्यार्थ्याचे नाव हरिदास अंबादास शेखरे असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिदास याचे वय 16 वर्षे होते तो दहावीच्या वर्गात शिकत होता. गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आश्रमशाळेतील निवासस्थानी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेने पुन्हा एकदा आश्रमशाळा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न व सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. त्याने आश्रमशाळेतील विद्यार्थिनीला चिठ्ठी दिली होती. त्यानंतर संबंधित मुलीने वर्गशिक्षकांकडे तक्रार केली होती. वर्गशिक्षकांनी याबाबत मुख्याध्यापिकांना माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्याला कार्यालयात बोलावून समज देण्यात आली होती. पालकांना बोलावून घेण्याची तसेच या प्रकारामुळे अभ्यासावर परिणाम होऊ नये, याबाबत त्याला सूचना करण्यात आली. दरम्यान त्यानंतर विद्यार्थी आपल्या निवासाच्या खोलीत गेला. काही वेळाने इतर विद्यार्थी खोलीत गेले असता त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी तत्काळ शिक्षकांना दिली. शिक्षकांनी तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे. वणी पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, हरिदास शेखरे या आदिवासी शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर आता त्याच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिस ठाण्याची पायरी गाठली आहे. हरिदासच्या मृत्यूमागील परिस्थितीची सखोल चौकशी व्हावी. त्याचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला. त्यामुळे संबंधित आश्रमशाळा प्रशासन व संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी आणि आपल्या तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *