श्वासात अडथळे, छातीत घरघर; नवी मुंबईतील तरुणाच्या त्रासामागे 3 महिने जुनं अनपेक्षित कारण, फुप्फुसरोग तज्ज्ञांमुळे दिलासा

मागील दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास आणि छातीत घरघर जाणवत असल्याने विविध ठिकाणी उपचार घेऊनही दिलासा न मिळालेल्या ३८ वर्षीय रुग्णाच्या त्रासाचे अनपेक्षित कारण अखेर समोर आले. रुग्णाच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत तब्बल तीन महिन्यांपासून चिकूची बी अडकून राहिली होती. फुप्फुसरोगतज्ज्ञांनी ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून ही बी यशस्वीरीत्या बाहेर काढत रुग्णाला मोकळा श्वास घेण्यास मदत केली.

दोन-तीन महिन्यांचा त्रास

उलवे येथील मनोज (नाव बदलले आहे) यांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातीला त्यांनी विविध डॉक्टरांकडून उपचार घेतले. औषधांमुळे काही काळ आराम मिळत होता; मात्र त्रास पूर्णपणे कमी होत नव्हता. अखेर एका डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा सल्ला दिल्यानंतर पुढील तपासणीत आजाराचे खरे कारण स्पष्ट झाले.

तात्काळ मोकळा श्वास

फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल आणि डॉ. तनय सिन्हा, तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शहाबुद्दीन यांच्या पथकाने रुग्णाची तपासणी केली. एचआरसीटी स्कॅनमध्ये डाव्या मुख्य श्वासनलिकेत अरुंदपणा आढळून आला. मात्र हा अरुंदपणा कोणत्या कारणामुळे झाला, हे स्पष्ट होत नव्हते. ब्रॉन्कोस्कोपीमध्ये डाव्या मुख्य श्वासनलिकेत चिकूची बी अडकली असल्याचे निदान झाले. या बीमुळे श्वासनलिका जवळपास पूर्णपणे बंद झाली होती. संबंधित भागात सूज आली होती, तसेच स्रावही साचला होता. रुग्णाला भूल देऊन जाळीसारख्या विशेष उपकरणाच्या (मेश स्नेअर) साहाय्याने ही बी अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आली. बी बाहेर काढताच श्वासनलिका खुली झाली आणि रुग्णाला तत्काळ मोकळा श्वास घेता आला.

५० मिनिटांची प्रक्रिया

‘ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. बी जवळपास तीन महिने श्वासनलिकेत अडकून राहिल्याने ती आतील थराला घट्ट चिकटली होती. शिवाय तिचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळे उपकरणाच्या साहाय्याने तिला पकडणे अवघड होते. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या प्रक्रियेत अत्यंत अचूकतेने बी बाहेर काढण्यात आली. प्रक्रियेदरम्यान श्वासनलिकेला कोणतीही दुखापत झाली नाही,’ असे डॉ. शाहिद पटेल यांनी सांगितले

 

तीन महिन्यांपूर्वीची घटना आठवली

तीन महिन्यांपूर्वी चिकू खाताना रुग्णाला अचानक ठसका लागल्याचे नंतर समोर आले. त्यानंतर त्रास काही प्रमाणात कमी झाल्याने ही घटना गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. ही माहिती डॉक्टरांनाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे योग्य निदान होण्यास विलंब झाला.

श्वासनलिकेत बाहेरील वस्तू दीर्घकाळ अडकून राहिल्यास गंभीर संसर्ग, वारंवार न्यूमोनिया किंवा फुफ्फुसाच्या काही भागाचे कायमस्वरूपी नुकसान अशा गुंतागुंती उद्भवू शकतात. प्रौढांमध्ये अन्नाचा कण किंवा फळांची बी श्वासनलिकेत अडकण्याच्या घटना तुलनेने दुर्मीळ असल्या, तरी त्यांची लक्षणे अनेकदा कफ किंवा फुफ्फुसाशी संबंधित इतर आजारांसारखी दिसू शकतात.

‘जेवताना बोलणे, हसणे किंवा घाई करणे टाळा’

जेवताना बोलणे, हसणे किंवा घाई करणे टाळावे, असा सल्ला डॉ. तनय सिन्हा यांनी दिला. अशा वेळी अन्नाचा कण किंवा फळांची बी चुकून श्वासनलिकेत जाण्याचा धोका वाढू शकतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ठसका लागल्यानंतर दीर्घकाळ खोकला, घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *