भारत आणि त्याचे तीन शेजारी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमार यांचा बेकायदेशीर औषध उत्पादन करण्यात समावेश आहे. बेकायदेशीर औषध उत्पादन व संक्रमण करणार्या 22 राष्ट्रांच्या यादीत भारताचाही समावेश आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
या यादीत इतर देशांमध्ये, बहामाज बेलिझ, बोलिव्हिया, कोलंबिया, कोस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, इक्वेडोर, अल साल्वाडोर, ग्वाटेमाला, हैती, होंडुरास, जमैका, लाओस, मेक्सिको, निकाराग्वा, पनामा, पेरू आणि व्हेनेझुएला यांचाही समावेश आहे.
ओबामा म्हणाले की, बोलिव्हिया, बर्मा (म्यानमार), आणि व्हेनेझुएला हे देश ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ प्रतिबंध‘ कराराचे पालन करण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. गेल्या बारा महिन्यांत या देशांनी कोणतेही पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. अमेरिका परराष्ट्र संबंध प्राधिकृत कायद्यानुसार बोलिव्हिया, बर्मा (म्यानमार), आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये अंमली पदार्थांना प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध न घालू शकल्यास अश्या देशांवर काही निर्बंध घालण्यात येतील, असेही ओबामा यांनी सांगितले.
