भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूच्या अफवेला बळी पडून शोकसभा आयोजित केल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्यात आली आहे. ओदिशातील बलासोर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका कमलकांता दास यांना निलंबित करण्यात आलं आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सध्या दिल्लीतील निवासस्थानी राहत आहेत. त्यांची प्रकृती बिघडली असली तरी मृत्यूच्या अफवेची शहानिशा न करताच शाळेत शोकसभा आयोजित केल्याने कारवाई करण्यात आली. दास यांनी सर्व शिक्षकांची बैठक बोलावून वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली आणि शाळा अर्धा दिवस सोडली होती.
‘एका प्रशिक्षण कार्यशाळेत दुसऱ्या शाळेतील सहशिक्षिकेकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्याची ‘बातमी’ समजली, आणि कुठलीही चौकशी न करता मी शोकसभा आयोजित केली’ अशी खंत कमलकांता दास यांनी कारवाईनंतर व्यक्त केली आहे.
‘एखाद्या मुख्याध्यापिकेने कुठलाही विचार न करता अशी बेजबाबदार कृती करणं अत्यंत दुर्दैवी आहे. दिग्गज व्यक्तीच्या निधनाच्या वृत्ताची खात्री न करता थेट शोकसभा भरवल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे’ अशी माहिती बलासोरचे तलाठी सनातन मलिक यांनी दिली. ही बाब लक्षात आल्यानंतर मलिक यांनीच घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.
काहीच महिन्यांपूर्वी झारखंडच्या शिक्षणमंत्री नीरा यादव यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना जिवंतपणी श्रद्धांजली अर्पण केली होती. त्याच्यानंतर यादव यांच्यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली. दुर्दैवी योगायोग म्हणजे यादव यांच्या कृत्यानंतर आठवड्याभरातच कलाम यांची प्राणज्योत मालवली होती.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना नुकतंच ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाजपेयी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणं टाळतात.

