ठाकरे गटाला ५० जागा मिळणे कठीण! मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत आशीष शेलार यांचे भाकीत

गेल्या २५ वर्षांत मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला प्रत्येक निवडणुकीत नाकारले व कायम घरचा रस्ता दाखविला. हिंदूत्वामुळे असलेल्या भाजपच्या समर्थनामुळे तुम्ही खुच्र्या उबवीत होता. आता परिस्थिती बदलली असून ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही आणि भाजप, शिंदे गट आणि रालोआतील अन्य घटकपक्षांना १५१ हून अधिक जागा मिळतील, असे भाकीत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी रविवारी केले.मुंबई भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती कार्यालयात पार पडली. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, आमदार अमित साटम, योगेश सागर, सुनील राणे, पराग अळवणी आदी उपस्थित होते.

आम्ही बंद खोलीतून स्वत:च्या मनाशी बोलणारे नसून खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत, असे सांगून शेलार म्हणाले, कर्नाटकच्या निकालानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती ते लगेच बोलू लागले. आम्हाला अपेक्षित यश किंवा सत्ता मिळाली नाही. त्याचे आत्मचिंतन आणि परीक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, पाच जागा एक हजाराहून कमी मतांनी, तीन जागा दोन हजारांहून कमी, तर २२ जागा पाच हजारांहून कमी मतांनी, तर १६ जागा सहा-सात हजार मतांनी गेल्या आहेत. या जागा भाजपला मिळाल्या असत्या, तर बहुमत मिळाले असते. भाजपच्या झेंडय़ावर गाय कशी कापली, हे दाखवून उन्माद साजरा करणाऱ्या काँग्रेसबरोबर बसणाऱ्या ठाकरे यांचा निषेध आहे.

राज ठाकरेंना कानपिचक्या

सुमारे ६ लाख ३२ हजार कोटी रुपयांच्या नोटा बाजारात असताना त्यापैकी ३ लाख कोटींच्या जर चलनात असतील, तर उरलेल्या ३ लाख ४० हजार कोटींच्या नोटा कुठे लपल्यात, हे शोधणे प्रामाणिकपणाचे काम आहे. चोर पकडले गेले पाहिजेत, असे स्पष्ट करीत शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांना टोला

मविआच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या खुर्चीच्या आजूबाजूला एकही खुर्ची नव्हती आणि त्यानंतर असलेल्या सोफ्यावर उद्धव ठाकरे बसले होते. त्यावरून मला कोण होतास तू काय झालास तू..हे गाणे आठवले. आमच्याबरोबर असताना देशाचे नेतृत्व त्यांच्याकडे जात होते. आम्हाला सोडून गेल्यावर ठाकरे यांना केजरीवाल ते केसीआर यांच्यापर्यंत सगळीकडे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *