कॅफेजवळ कुत्र्याचा मृतदेह दिसला, नंतर CCTV पाहून मालकही हादरला; पोलिसांकडून तपास सुरू

उस्मानपुरा परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका श्वानाला अज्ञात व्यक्तीने चाकूने भोसकून निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेमुळे श्वान प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सीसीटीव्हीमुळे हा प्रकार समोर आला आहे. शांतपणे उभ्या असलेल्या मुक्या जीवाचा निर्घुण हत्या करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरातील उस्मानपुरा भागांमध्ये २५ एप्रिल रोजी रात्री एक वाजता चौकामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या श्वानाला एका अज्ञात व्यक्तीने थेट चाकू भोसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमध्ये जखमी श्वानाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना परिसरातील एका कॅफेमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी कॅफे मालक अर्जुन काळे यांनी कॅमेरे चेक केले असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

प्रामाणिक आणि विश्वासू प्राणी म्हणून श्वानाची ओळख आहे. यामुळेच अनेक घरांमध्ये हा प्राणी पाहायला मिळतो. रस्त्यावर असलेल्या श्वानांना देखील त्रास दिल्याशिवाय ते कोणाला त्रास देत नाही. अनेक वेळा नागरिक या श्वानांना दगड मारतात त्यामुळे ते भुंकतात किंवा हल्ला करता.

ही संपूर्ण घटना कॅफे मालकाने प्राण्यांसाठी काम करणाऱ्या लाईफ केअर या एनजीओला सांगितली. घटनेचा सीसीटीव्ही देखील उपलब्ध करून दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्वान प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. श्वानाची निर्दयी हत्या करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी श्वान प्रेमींकडून होत आहे. दरम्यान याप्रकरणी लाईफ केअर अॅनिमल असोसिएशनचे धनराज शिंदे, जय शिंदे घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेऊन त्यांनी तक्रार दिली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यंनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *