शेतीच्या नुकसानीचे आता ई-पंचनामे; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, सर्वेक्षणासाठी उपग्रह, ड्रोनची मदत

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत. नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एकदिवसीय परिषदेत शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विभागांचे सचिव या वेळी उपस्थित होते.गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि अवर्षण आदी अनेक समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय केले जात असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. आपले शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *