रस्त्यालगत उभी केलेली वाहने चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोन सराईत आरोपींना देवनार पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी मुंब्रा येथील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई आणि नवी मुंबईत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोवंडीच्या गौतम नगर परिसरात राहणाऱ्या फुरखान कुरेशी (२९) या तरुणाने त्याची दुचाकी इमारतीजवळ उभी केली होती. दुसऱ्या दिवशी अचानक ही दुचाकी गायब झाली. याबाबत त्याने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता, दोन आरोपींची ओळख पटली. दोन्ही आरोपी मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा येथून या दोघाना ताब्यात घेतले. सैजन कुरेशी (२२) आणि सउध खान (२९) अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींवर मुंबई आणि नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून पोलिसानी त्यांच्याकडून पाच लाख २० हजार रुपये किंमतीची वाहने जप्त केली.