जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना जंगलात रात्र काढावी लागली आणि तेही अशा जंगलात जिथे तापमान शून्य अंश सेल्सिअसच्याही खाली आहे. जिथं खायला काही नाही, अशावेळी राष्ट्रध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेचं काय होईल, हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे बराक ओबामा यांचा नुकताच समोर आलेला हा व्हिडीओ.
बराक ओबामांनी अलास्काच्या जंगलात चक्क तीन दिवस काढले. यावेळी त्यांची साथ दिली ती सर्व्हायव्हल एक्सपर्ट अर्थात बेअर ग्रिल्स. होय, कच्चं मासं खाऊन, आपत्कालीन परिस्थिती कसं जगायचं हे सांगणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मधला बेअर ग्रिल्स.
जे जे बेअर करतो, तेच त्यांनी केलं आणि जंगलात अडकल्यावर, काय करावं याच्या टिप्सही ओबामांनी दिल्या. या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्याला जगभरातील नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.
खरंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर जातात, त्यावेळी त्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यालाही अनेक चाचण्यातून जावं लागतं. एवढ्या कडक सुरक्षाव्यवस्थेत राहणाऱ्या ओबामांनी अलास्काच्या जंगलात अस्वलाने अर्धवट खाल्लेला मासा खाऊन दिवस काढला.
बराक ओबामा ग्रिल्सच्या ‘रनिंग वाईल्ड शो’मध्ये भाग घेत आहेत. या शोचं प्रसारण वर्षअखेरीस होणार आहे. तीन दिवसांच्या शूटिंगदरम्यान आलेला अनुभव ओबामा यांनी शेअर केला आहे.
ऑफिसच्या कैदेतून मुक्तात
माझ्यासाठी हा शानदार दिवस आहे. मी ऑफिसच्या कैदेत नाही आणि टाईट सूट-बूट परिधान करण्याची अपरिहार्यताही नाही. बेअर ग्रिल्ससोबत ट्रेकिंग करण्यासाठी मी संपूर्ण तयारी केली होती. पण त्याने जे जेवण दिलं, ते खाण्यासाठी माझं मन तयार नव्हतं. त्या दुपारी आम्ही नदीच्या किनारी होतो. बेअर म्हणाला की, चला जेवण करु. मी होकारार्थी मान हलवली, असं ओबामा म्हणाले.
अस्वलाने अर्धवट खाल्लेला मासा आमच्या वाट्याला
ओबामा म्हणतात, बेअर ग्रिल्सने त्याच्या छोट्या बॅगमधून गवतात गुंडाळलेला मासा काढला. त्याने सांगितलं की, अस्वलाने अर्धवट खाल्लेला हा मासा आहे. हे सांगणं गरजेचं होतं का, मासा आहे हीच मोठी गोष्ट आहे, असं मी त्याला म्हणालो. नंतर त्याने आग लावली आणि मासा भाजायला सुरुवात केली. दुसरं काही मिळण्यापेक्षा याला मासा मिळाला हेच बरं झालं, नाहीतर हा तर काहीही खातो, असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला. थोड्या वेळाच मासा भाजून झाला. मी त्यातला एक तुकडा खाल्ला, तो खरंच खूप चविष्ट होता. बेअर चांगला कूक नाही पण तो मासा व्यवस्थित भाजतो. आमच्याकडे तिखट मसाला नव्हता, तो मिळाला असता तर चव आणखी वाढली असती, हे खरं. मी लोकांना एक सल्ला नक्कीच देईन की, आयुष्यात असा अजब प्रकार एकदा तरी करायलाच हवा. माझे सिक्रेट एजंट मला कोड वर्डमध्ये ‘बेअर’ बोलतात. प्रोटोकॉल तोडून मी कुठे गेलो तर ते बोलतात की, ‘बेअर’ निसटला. इथे त्यांच्यासोबत हे वारंवार होत आहे.

