जपानमध्ये मुसळधार पावसामुळे जलप्रलय, गेल्या 50 वर्षातील सगळ्यात मोठा पूर

जपानमध्ये मुसळधार पावसामुळे जलप्रलय, गेल्या 50 वर्षातील सगळ्यात मोठा पूर

मुसळधार पावसामुळे जपानमध्ये जलप्रलय आला आहे. जपानच्या अनेक शहरांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जपानमध्ये पाण्यानं अक्षरश: रौद्ररूप धारण केलं आहे.

ज्या जपाननं त्सुनामीचा विध्वंस पाहिला. त्याच जपानला आज पुन्हा एकदा त्सुनामीची आठवण झाली ती आलेल्या पुरामुळे. गेले काही दिवस जपानच्या अनेक शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळेच अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत.

जपानमधील किनुगावा नदीनं अक्राळ-विक्राळ रूप धारण केलं आणि शहरात प्रलय आला. पाण्याच्या शक्तीशाली लाटांमुळे अख्खी घरं कागदासारखी वाहून गेली. तर तिकडे लाटांपुढे झाडांनीही आपली सहनशक्ती सोडली.

पाण्याचा अंदाज न आलेली लोकं घरांच्या छतावर चढली. पाण्याचा वाढत्या प्रवाहापुढे जीव मुठीत घेऊन ईश्वराचा धावा करत राहिली. पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी जी भक्कम गोष्ट दिसेल तिचा आधार घेऊन लोक मदतीची प्रतीक्षा करु लागले.

सेनेच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं आहे. गेल्या 50 वर्षात जपानमध्ये आलेला हा सगळ्यात मोठा पूर आहे. या पुरामुळे अंदाजे 1 लाखाहून अधिक लोकांनी घरं सोडली आहेत. पुराचा तडाखा बसलेल्या जपान सरकारचे लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *