बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी राज्यात १७ गैरप्रकार उघडकीस

राज्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर पद्धतीने कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी १७ गैरप्रकार उघडकीस आले असून, सर्वाधिक गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली.

राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारी सुरू झाली. या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय मंडळ, जिल्हाधिकारी स्तरावर भरारी आणि बैठे पथकाची प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्यवस्था, परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरातील छायाप्रतीची दुकाने बंद केली जातील. तसेच सहायक परीरक्षकाचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात १७ गैरप्रकार झाल्याचे समोर आले.

राज्य मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक सात गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली. तर नागपूर आणि औरंगाबाद विभागात प्रत्येकी तीन, अमरावती आणि लातूर विभागात प्रत्येकी एक, नाशिक विभागात दोन गैरप्रकार झाल्याचे आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *