मुंबई शहरात एक दिवसाआड पाणी पुरवा

मुंबई शहरात एक दिवसाआड पाणी पुरवा

मुंबईत २००८-०९ मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध करणा-या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मुंबईत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

सत्ताधारी पक्ष ही मागणी करत असल्याने पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरत असल्याचे शिवसेनेने दाखवून दिले आहे. दरम्यान, पाणीकपात जारी केल्यानंतर त्याच्या योग्य नियोजनासाठी तसेच उपाययोजनांचा कोणताही कार्यक्रम हाती न घेणा-या प्रशासनाचा तीव्र निषेध करत सर्वच पक्षांनी गदारोळ घालत प्रशासनाचा घाम काढला.

गेल्या वर्षाच्या तुलनेत ३१ दिवसांचा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे तलावातील पाण्याच्या साठयाचा माहिती अहवाल प्रशासनाने स्थायी समितीपुढे सादर केला. कपात जारी केल्यापासून घाटकोपरमध्ये गेले तीन दिवस पाणीच नाही. पंतनगर परिसरात पाण्यामुळे वणवण करण्याची वेळ आली आहे.

२४ तास पाण्याची घोषणा केल्यानंतर तेथे ३ तास पाणी दिले जात आहे. त्यामुळे याची श्वेतपत्रिका काढली जावी,अशी मागणी त्यांनी केली. यावर शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी शहरात पाणी पुरवठा चांगल्याप्रकारे आहे. परळ, लालबाग परिसरात सकाळी सहा वाजता पाणीपुरवठा केला जावा. तसेच शहर भागातील पाणीपुरवठा एक दिवस आड केला जावा, अशी मागणी केली.

वेळ आणि पाण्यासोबतच जलअभियंता विभागाने दाबही कमी केला आहे. त्यामुळे डोंगर भागांमध्ये पाणीपुरवठा होत नाही,अशी तक्रार मनसेच्या नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी केली, तर पाण्याची श्वेतपत्रिका काढली जावी, अशी मागणी दिलीप पटेल यांनी केली. कांजूर भागांमध्ये २४ तास पाणी पुरवठा होतो, पण तेथील विभागाच्या सहायक आयुक्तांनी पुढाकार घेत ही वेळ कमी केली.

गळती बंद होऊन पाणी चोरी करणा-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रमेश कोरगावकर यांनी केली. पाण्याचे नियोजन करण्याबाबत प्रशासनाची मानसिकताच नाही, असे सांगत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी एक खिडकी योजना सुरू करावी,अशी मागणी केली.

पाणी माफियांना संरक्षण देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न पाणीकपातीनंतरही लाँड्री, वाहने धुणारी सर्विस सेंटर,डेअरी यांचे पाणी कमी केले नाही. त्यांचे पाणी बंद केले जावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. पाणी चोरी व गळतीवर उपाययोजना करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही पाण्याची चोरी करण्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

सभागृहनेत्या व विनोद शेलारांमध्ये खडाजंगी

पल्लवी दराडे यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे भाजपाचे विनोद शेलार यांनी गोंधळ घालायला सुरुवात केला. यावेळी सभागृहनेत्यांनी, विनोद शेलार यांना रोखतच थांबा, जरा ऐकायची तयारी ठेवा,असे सांगत गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये तू तू मै मै चांगलीच रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *