महापालिकेची आर्थिक अवस्था दयनीय झालेली असतानाच, पालिकेकडून पुर्ण झालेल्या कामांवरच पुन्हा कोट्यावधीची उधळपट्टी केली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या विभागीय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांनी केला आहे. या आरोपासोबत त्यांनी कळवा आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील संबंधित कामांची यादीच समाजमाध्यमांवर जाहीर केली असून त्याचबरोबर नव्याने स्थापन झालेल्या गटात सहभागी झालेल्या नगरसेवकांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. या आरोपांमुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रवादीच्या विभागीय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांनी नुकतेच एक ट्वीट केले असून त्यात पालिका प्रशासनावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
एकीकडे ठाणे महापालिकेची आर्थिक अवस्था अत्यंत दयनिय असल्याचे वृत्त अनेकदा प्रसारीत होत आहे. असे असतानाच ठाणे महापालिकेकडून अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. या कामांमध्ये, कळव्यातील इंदिरा नगर पादचारीपुल ते रामेश्वर सोसायटी या रस्त्याचे युटीडब्ल्यूटी पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यासाठी ३ कोटी रुपये, खारीगाव रेल्वे फाटक ते सर्व्हेक्षर बिल्डींग या रस्त्याचे युटीडब्ल्यूटी पद्धतीने काँक्रिटीकरणासाठी ४ कोटी ६० लाख, स्वामी समर्थ मठ ते ओंकार सोसायटी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ६ कोटी ५० लाख, आरजी २२ ते रघुकूल सोसायटीमधील मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २ कोटी ५० लाख, केशव हाईट्स ते रिलायन्स पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ४ कोटी, मुंब्रा प्रभाग समितीमधील रेतीबंदर स्मशानभूमी रस्ता तयार करण्यासाठी १ कोटी १७ लाख आणि ओऍसीस आर्केड येथील रस्त्यासाठी ५९ लाखांची तजवीज करुन या कामांचे वाटपही करण्यात आलेले आहे, असा आरोप ॠता आव्हाड यांनी केला आहे. आधीच ही सर्व कामे पूर्ण झाली असून हे सर्व रस्ते सुस्थितीमध्ये आहेत. या रस्त्यांच्या कामांची हमी देखील घेतली जात आहे. असे असतानाही नव्याने स्थापन झालेल्या गटात सहभागी झालेल्या नगरसेवकांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असा आरोप करत त्यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. दरम्यान, केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ठाणेकरांच्या करातून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याने सामान्य ठाणेकरांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
