तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक

बनावट ओळखपत्र दाखवून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील लॉजवर शोध मोहीम राबवणाऱ्या तोतयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.. तोतयागिरी केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली.

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील लॉजवर आरोपी सोमवारी गेला होता. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने तेथील कर्मचाऱ्यांना सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. त्यानंतर त्याने लॉजमधील ग्राहकांची नोंदवही तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने ग्राहकांच्या खोलीत जाऊन तपासणी करण्यास सुरूवात केली. तसेच ग्राहकांच्या ओळखपत्रांचे छायाचित्र घेण्यास सुरूवात केली. त्याच्या वागण्यावरून आरोपी सीबीआय अधिकारी नसल्याचे एका ग्राहकाच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर येऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील ओळखपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. दीपक मोरे अशी आरोपीचे नाव असून तो मानखुर्द येथील रहिवासी आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *