डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेला लातुरातील शेतकरी औषधोपचारांना बरा झाला. मात्र हॉस्पिटलने लादलेलं अडीच लाखांचं बिल पाहता रोगापेक्षा इलाज भयंकर या म्हणीचा प्रत्यय आला आहे.
लातूरच्या कोळपा तांडामध्ये राहणाऱ्या राम चव्हाणांची साडे चार एकर जमीन आहे. शेतीत पाण्याची सोय करण्यासाठी घेतलेला बोअर अपयशी ठरला. उत्पन्नाचं एकमेव साधन असलेली शेतीही निसर्गाच्या कृपेवर अवलंबून.
चव्हाण यांच्या डोक्यावर आयडीबीआय बँकेचं एक लाखाचं कर्ज आहे, शिवाय काही खासगी उसनवारीही. त्यामुळे त्यांनी मरण कवटाळण्याचा निर्णय घेतला.
कीटकनाशक पिऊनही राम सुदैवाने बचावले. राम चव्हाणांवर 23 तारखेपासून लातूरच्या लोकमान्य रुग्णालयात आहेत हॉस्पिटलातील औषधोपचारांवर दीड लाखांहून अधिक खर्च आला, तोही कर्ज काढूनच. काही राजकीय पक्ष, आमदार-खासदार, काही संघटना पुढे आल्या आणि सव्वा लाखांची मदत केली. मात्र अजून सव्वा लाख रुपयांची थकबाकी आहे.
दवाखाना प्रशासनाने बिल भरा आणि रुग्णाला घेऊन जा असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सव्वा लाख रुपये कुठून आणायचे हा प्रश्न चव्हाणांपुढे उपस्थित झाला आहे.
