एकटी असल्याचं पाहून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या रोडरोमियोंना 16 वर्षांच्या मुलीने चांगलीच अद्दल घडवली आहे. एका छोट्या आणि अंधाऱ्या गल्लीतून एकटी चालत येणारी मुलगी पाहून दोन टवाळखोरांना शिकार स्वत:हून आपल्याकडे येत असल्याचं वाटलं. आपण तिला सहजरित्या पकडू असा विचार त्यांच्या मनात आला. दारुच्या नशेत असलेले ते दोघे तिच्याजवळ पोहोचले आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जे घडलं, ज्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर तर आलंच पण नशाही उतरली.
या धीट मुलीने पहिल्यांदा दोघांच्या तोंडावर ठोसा मारला आणि त्यानंतर दोन्ही पायांच्या मध्ये लाथ मारली. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या दोन्ही टवाळखोरांनी जीव मुठीत घेऊन धूम ठोकली.
कोलकाता शहराच्या उत्तरेतील मध्यममग्राममध्ये छेडछाड आणि बलात्कार या नेहमीच्या घटना आहेत. मात्र एकट्या मुलीने कराटेची टेक्निक वापरुन स्वत:चा बचाव करणं आणि टवाळखोरांना अद्दल घडवल्याने तिचं सगळीकडे कौतुक होत आहे.
पत्रकारांशी बोलतानाही ती अतिशय उत्साही दिसत होती. मी त्यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारेल. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. मला त्यांची भीती वाटत नाही. माझ्यासोबतही बलात्कारासारखी घटना घडू शकते, त्यामुळे वर्षभरापूर्वीच मी कराटेचा क्लास लावला होता. शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे अशी परिस्थिती ओढावली तर त्यातून स्वत:चा बचाव करावा, असं मला वाटायचं. आता स्वत:चा बचाव केल्याचं मला आनंद आहे, असं ही शूर मुलगी म्हणाली.
मात्र दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत. पाच मवाल्यांची एक टोळी इथे महिलांना त्रास देत असत. मागील आठवड्यापासून ते माझी आणि माझ्या मैत्रिणीची छेड काढत होते. याबाबत मी स्थानिक लोकांकडे तक्रार केली, पण त्यांच्याविरोधात बोलण्याचं कोणाचंही धाडस झालं नाही. महिलांच्या मनात तिच्याविषयी दहशत होती. त्यांनी मर्यादा ओलांडली तर त्यांना धडा शिकवेन, असं स्वत:च्या मनाशी ठरवलं होतं, असं मुलीने सांगितलं.
संबंधित मुलगी सोमवारी रात्री कराटे क्लासमधून घरी परतत होती, त्यावेळी दोघांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या दाव्यानुसार, ते दोघे बाईकवरुन जात होते. मात्र अचानक त्यांनी बाईकचा वेग वाढवला आणि मला जोरधार धक्का दिला. ते दारुच्या नशेत होते. त्यांनी मला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर त्यांनी माझे हात पकडत फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. पण मी धीर एकवटत एकाला ठोसा मारला आणि दुसऱ्याला लाथ मारली. पण यानंतर दोघेही तिथून पसार झाले.
तरुणीने याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्यांना पकडलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मी कराटे शिकण्यास सुरुवात केली, तेव्हा आई-वडिलांनी मला विरोध केला होता. पण आता मी मार्शल आर्ट्सचा सराव कधीच थांबवणार नाही हे मात्र नक्की.
