ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा उठलेल्या असताना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या साऱ्याला पूर्णविराम दिला. मागील 24 तासांमध्ये गोखले यांची प्रकृती खालावली असली तरीही त्यांच्यावर उपचार करत डॉक्टरांची टीम प्रयत्नांनी पराकाष्ठा करत असल्याची माहिती डॉक्टर आणि गोखले कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी दिली. गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे गोखलेंच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देणारं जारी करण्यात आलं त्यातून ही माहिती समोर आली. सध्याच्या घडीला गोखले यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काय म्हणाले डॉक्टर आणि निकटवर्तीय?
‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. गेल्या 24 तासांपासून ते जगण्यासाठी झुंज देत आहेत. त्यांच्या शरीरातील विविध अवयव निकामी झाले असून, सध्या डॉक्टांची टीम त्यांच्या परीनं शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत’, असं गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
सोशल मीडियावर तर अनेकांनी या कलाकाराला श्रद्धांजलीही वाहिली. पण, कोणत्याही अधिकृत माहितीआधीत नेटकरी आणि चाहत्यांनी केलेली अतीघाई पाहता अखेर रुग्णालयाकडूनच गोखले यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
