भगत सिंगांच्या फाशीच्या सीनची रंगीत तालिम करणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू

कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय मुलाचा त्याच्या राहत्या घरातच गळफास लागून मृत्यू झाला आहे. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हा मुलगा शहीद भगत सिंग यांच्या फाशीच्या शिक्षेच्या सीनची घरामध्ये रंगीत तालिम करत होता आणि ही घटना घडली तेव्हा तो घरता एकटाच होता. आई-वडील बाहेरून घरी आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांना मोठा धक्का बसला.

संजय गौडा या मुलाचे आई-वडील नागराज आणि भाग्यलक्ष्मी शहरातील केलागोट बडावने भागात एक भोजनालय चालवतात. बडावने पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केआर गीताम्मा यांनी घटनेबद्दल सांगितले की, इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती त्याची आई रात्री जवळपास ९ वाजता घरी आल्यानंतर उघडकीस आली. घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी बराचवेळ दरवाजा ठोठवला. मात्र तरीही आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांच्या शेजारील नागरिक आले त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलगा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

यानंतर तत्काळ मुलाची आई भाग्यलक्ष्मी यांनी पती नागराज यांना फोन केला आणि त्यांनी मास्टर की द्वारे दरवाजा उघडला. संजयला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी माहिती दिली की मुलाने दोरीने गळफास बनवला आणि त्यानंतर त्याने सराव करण्याच्या दृष्टीने डोक त्यात ठेवलं व तो लटकला यातच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *