मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी ११. ५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत ब्लॉक

दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरवर कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवारच्या मेगाब्लॉकमधून पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी ११. ५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील जलद लोकल सेवा धिम्या मार्गावर वळण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) -कल्याण, कसारा, खोपोली या मुख्य मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावतील. हार्बरवरही कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-कुर्ला, वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार मध्यरात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ पर्यंत गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान अप धिम्या आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन स्थानकांदरम्यान डाऊन जलद लोकल धिम्या आणि अप धिम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. येत्या रविवारी मात्र मेगाब्लॉक नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *