अलिबाग ते वडखळ महामार्गाच्या दुपदरीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण असलेल्या पर्यटक आणि अलिबागकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलिबाग ते वड़खळ या २२.२ कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम वार्षिक आराखडा २०२२-२३ अंतर्गत पेवड शोल्डरसह दुपदरी करण्याचे काम (काँक्रीट) मंजूर करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांना या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत.
गेली अनेक र्वष या मार्गाचे दुपदरीकरण व्हावे अशी मागणी केली जात होती. त्यासाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. त्याला १६६ ए असा क्रमांकही देण्यात आला होता. महामार्गाचा डीपीआरही तयार करण्यात आला होता. पण भूसंपादनासाठी लागणारा निधी हा रस्त्याच्या कामासाठी लागणारा निधी यापेक्षा जास्त होत असल्याने प्रकल्प रखडला. नंतर याच परिसरातून अलिबाग विरार कॉरीडोर प्रकल्प जात असल्याने हा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे महामार्ग प्राधिकारणाने हा रस्ता पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची काही महिन्यांपूर्वी या संदर्भात भेट घेतली होती. रस्त्याचे दुपदरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. यानंतर या कामाला नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आतातरी हे काम मार्गी लागेल अशी आशा अलिबागकरांना आहे.
प्रकल्प का महत्त्वाचा..
अलिबाग शहराला जोडणाऱ्या या मार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय आणि पर्यटनस्थळ असल्याने अलिबागला दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. या शिवाय धरमतर येथील जेएसडब्ल्यू प्रकल्प, पीएनपी पोर्टमधून अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असते. यामुळे रस्त्यावरून हजारो वाहने ये जा करत असतात. पण सध्या या रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
