माझगाव परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरातून फेब्रुवारी महिन्यापासून महागड्या वस्तू, दागिने व रोख रक्कम गायब होत होती. एखादा ‘जीन’ ते गायब करीत असल्याचा समज झाल्यामुळे व्यावसायिकाने पोलिसात तक्रारच केली नाही. मात्र अलिकडेच त्यांच्या घरातून १० लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम व दागिने गायब झाले आणि अखेर या व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर भलताच प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली असून ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
माझगाव परिसरात वास्तव्यास असलेले अब्दुलकादर शब्बीर गोघावाला (४०) यांच्या घरातून फेब्रुवारी २०२२ पासून अचानक छोट्या-मोठ्या वस्तू गायब होऊ लागल्या होत्या. हा विचित्र प्रकार वाटल्याने गोघावाला यांना एखादा ‘जीन’ यामागे असल्याचा समज झाला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार करणे टाळले. मात्र २३ सप्टेंबर रोजी अचानक त्यांच्या घरातून चार लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, १० लाख रुपयांची रोख अशी १४ लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेली. या प्रकारानंतर त्यांनी घर विकून इतरत्र वास्तव्यास जाण्यचा निर्णय घेतला होता. पण एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना याप्रकरणी पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गोघावाला यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पैसे, दागिने आणि अन्य वस्तू ‘जीन’ घेऊन जात असावा, असा दावा तक्रारदाराकडून सुरूवातीला करण्यात आल्यामुळे पोलीसही चक्रावले. पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार दशरथ सोनावणे, संजय जाधव, शिपाई राकेश जाधव यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान गोघावाला यांच्या नात्यातील एका १२ वर्षांच्या मुलीशी पोलिसांनी संवाद साधला. मनात शंकेची पाल चुकचुकल्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी या प्रकरणाचा उलगडा झाला. सूरतमधील आरोपी नातेवाईकाच्या सांगण्यावरून ही मुलगी घरातील वस्तू चोरून त्याला देत असल्याचे उघडकीस आहे. अखेर पोलिसांनी याप्रकरणी हुसैन जुर्जर पत्रावाला (१९), हुसैन मुर्तझा बॉम्बेवाला (२२) व अब्बास आदम अत्तारी (२२) यांना गुजरातमधून अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
