अतिवृष्टीने यंदा कापूस उत्पादन १५ ते २० टक्के घटले असून त्यास सध्या प्रति क्विंटलला सात ते नऊ हजारांचा भाव मिळत आहे. मंदीच्या प्रभावाने आगामी काळात भाववाढीची शक्यता कमी आहे. सद्य:स्थितीत सूतगिरण्यांमधून कापसाला मोठी मागणी आहे. युरोपीय देशांसह अमेरिकेतही कापूस निर्यात होत आहे. बांगलादेशातही थोडय़ाफार प्रमाणात कापूस निर्यात सुरू झाली आहे. खान्देशातील जळगावसह धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. गतवर्षी कापसाला नऊ ते १३ हजारांपर्यंत भाव मिळाल्याने यंदा कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढले. ती ११० टक्क्यांवर झाली. त्यात कोरडवाहू कपाशीची लागवड तीन लाख चार हजार ३३ हेक्टर, तर बागायती लागवड दोन लाख ३९ हजार २२९ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली. जिल्ह्यात गतवर्षी २०२१-२२ मध्ये साडेपाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. सुरुवातीला चांगली पीकस्थिती होती. जेव्हा कपाशीला बोंडे लागली, तेव्हा नेमकी अतिवृष्टी झाली. त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला. केवळ १० ते २० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात आले होते. यामुळे कापसाची टंचाई भासली होती. जिनिंग प्रेसिंग उद्योग चालविण्यासाठी कापसाची मोठी गरज असल्याने त्यांनी सुरुवातीला नऊ हजारांचा भाव दिला गेला. नंतर गरज वाढली आणि कापूस कमी यांमुळे मार्चमध्ये साडेनऊ हजारांचा भाव मिळाला होता. सध्या कापूस वेचणीही सुरू आहे. वेचणीवेळीच पाऊस होत असल्यामुळे कापसाचे उत्पादन घटणार आहे. भाव चांगला असल्याने तूट भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. खान्देशात २२५हून अधिक जिनिंग प्रेसिंग उद्योग आहेत. आता कापसाचीही आवक होत आहे. खान्देशातून कापसाला गुजरातमध्ये अधिक मागणी असून तेथील व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कापसाची खरेदी करीत आहेत. सध्या खान्देशातून गुजरातमध्ये कापूस जात आहे. देशात केळीपाठोपाठ कापूस उत्पादनात तसेच निर्यात करण्यात जळगाव अग्रेसर जिल्हा आहे. देशात कपाशीचे १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून, उत्पादकता ४६९ किलो रुई प्रतिहेक्टर आहे. देशात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ५.६४ क्विंटल आहे, तर राज्यात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ३.७५ क्विंटल आहे.
