आंध्र प्रदेशच्या नेल्लोर, प्रकाशम, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यात रविवारी वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
सर्वाधिक सहा बळी नेल्लोर जिल्ह्यात गेले आहेत. नेल्लोरच्या पूडीपार्थी गावात काल रात्री वीज पडल्याने मुलगा आणि पित्याचा मृत्यू झाला. याशिवाय एका सुरक्षारक्षकालाही यात प्राण गमवावे लागले.
तर प्रकाशम जिल्ह्यात एक महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय गुंटूर जिल्ह्याच्या डोंडापाडू गावात एर आणि वडलामानू गावात एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले. तसंच कृष्णा जिल्ह्यात एक महिलेसह दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला.
दरम्यान, गुंटूर, गोदावरी आणि अनंतपूर जिल्ह्यातही पावसामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत पोहोचवण्याचं कार्य सुरु आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून काही भागांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
वीज कोसळून एकाच वेळी 20 लोकांचा मृत्यू होण्याची आंध्र प्रदेशातील ही पहिली घटना आहे.

