बारावी परीक्षा गणित विषयात किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी पुढील उच्च शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या ‘मिलाप ’ या योजनेंतर्गत पहिल्याच वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील परीक्षेत ८ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली.
राज्य शासनाने खासगी सहभागातून जूनपासून शिक्षण घेता घेता नोकरी आणि पदवी प्राप्त करुन देणारी ‘महाराष्ट्र यंग लिडर्स अस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ( मिलाप) या नावाने योजना सुरु केली आहे. त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग व एचसीएल टेक्नॉलॉजी यांच्यात करार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्षांत गणित विषयात ६० टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेल्या २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच वर्षांत या योजनेंतर्गत २२ ऑगस्ट अखेपर्यंत २४ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील परीक्षेत प्रशिक्षणासाठी ८ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील शंभरच्या आसपास विद्यार्थ्यांची थेट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने अन्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल, असे पगारे यांनी सांगितले.
