पश्चिम रेल्वे विस्कळीत

पश्चिम रेल्वे विस्कळीत

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असतानाही रविवारी अप मार्गावरील वाहतूक सुमारे ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मुंबईत दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी उपनगरातून येणा-या प्रवाशांचे हाल झाले. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेची परिस्थिती सुधारत नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या नावाने प्रवाशांनी लाखोली वाहिली.

रविवारी दुरुस्तीच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेतला होता.

यामुळे या मार्गावरील गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट केले होते. मात्र अर्धा ते पाऊण तास गाडय़ा उशिराने धावत होत्या.

या काळात जलद मार्गावरील गाडय़ा विलंबाने उशिराने धावत होत्या. त्यामुळे अनेकदा रात्री मेगाब्लॉक घेणा-या पश्चिम रेल्वे प्रशासनाने दहीहंडीचा विचार करून रात्री मेगाब्लॉक का घेतला नाही असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत होते.

दहीहंडी असल्याने मुंबई उपनगरातील अनेक जण कुटुंबासमवेत दादर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात दहीहंडी पाहण्यासाठी जातात. मात्र, गाडय़ा उशिराने धावत असल्याने दहीहंडीच्या उत्सवासाठी बाहेर निघालेल्या प्रवाशांना रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सहन करावा लागला.

परिणामी पश्चिम रेल्वेवरील दादर, अंधेरी, बोरिवली, वांद्रे, गोरेगाव यासह सर्वच स्थानकांत मोठी गर्दी झाली होती. यासंदर्भात पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांना विचारले असता मेगाब्लॉकमुळे गाडय़ा उशिराने धावत असल्याचे सांगितले. दरम्यान मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची वाहतूक देखील काही काळ उशिराने सुरु होती.

अर्धवट उदघोषणांमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ
पश्चिम रेल्वेवरील अप धीम्या मार्गावरील लोकल उशिराने धावत असल्याची उदघोषणा दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्थानकांत करण्यात येत होती. मात्र, वाहतूक कोणत्या कारणास्तव विस्कळीत झाली आहे याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *