राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त, शरद पवारांच्या संमतीने निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग तसंच सेल बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीनुसार, पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आलेत. राष्ट्रवादीचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांचं पत्र समोर आलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिलीये.

सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल पटेल यांची सही असलेल्या पत्रात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

याशिवाय प्रफुल पटेल यांनी ट्विट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान हा  बरखास्तीचा निर्णय घेण्यामागे कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. त्यानुसार आता नवीन कार्यकारणी कधी जाहीर होते आणि त्यात कोणाला संधी मिळते हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *