हवाई सुंदरीची अश्लील चित्रफित; प्रियकराचेच कृत्य

हवाई सुंदरी असलेल्या एका तरुणीची तिच्या प्रियकराने अश्लील चित्रफित तयार केली. ती चित्रफित नातेवाईकांना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून कपीलनगर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अल्पेश राजपाल शेंडे (२२ पंचशीलनगर) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पीडित तरुणी ही हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेत असताना एका लग्न समारंभात तिची अल्पेशसोबत ओळख झाली होती. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. तो संदेश पाठवायला लागला. हवाई सुंदरी असल्यामुळे तिने वेळ नसल्याचे कारण सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे तो तिचा पाठलाग करून वारंवार फोन करीत होता. यादरम्यान त्या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. दोघेही अनेकदा बाहेरगावी फिरायला गेले. यादरम्यान अल्पेशने तिचे अश्लील छायाचित्र काढले. दरम्यान, त्याने लग्नाचा तगादा लावला. तिने आताच लग्न करू शकत नाही, असे त्याला सांगितले. तरीही तो तिचा पाठलाग करून तिला लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता.

लग्न न केल्यास तिची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित करून नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत होता. त्यामुळे तरुणी घाबरली. नातेवाईकांपर्यंत छायाचित्र पोहचण्यापूर्वीच तिने याबाबतची माहिती तिच्या घरच्यांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तरुणीला समजून घेत पोलीस ठाण्यात पाठवले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पेशवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *