पेण शहरातील रामवाडी येथील एका बिल्डिंगच्या लिफ्टमधून पडून संगीता केळसकर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिल्डरने वारंवार केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने सदर महिलेचा नाहक जीव गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रामवाडी येथील रॉयल गार्डीअल या इमारतीमधील भाडेकरू म्हणून राहणाऱ्या संगीता संदीप केळसकर (वय ४९) या बिल्डिंगमधील लिफ्टने खाली येत असताना सदरची लिफ्ट पाचव्या मजल्याच्या दरम्यान आली असता अचानक बंद पडली.
या वेळी संगीता केळसकर यांनी लिफ्टमधील सुरक्षा अलार्म दाबल्याने खाली असलेला सुरक्षारक्षक धावत येऊन चावीचा वापर करून लिफ्टचा दरवाजा उघडून पाचव्या मजल्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला. उतरत असताना सदर महिलेचा तोल जाऊन लिफ्टच्या होलात खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहेत.
